रायगडावरील मंदिरे - मुर्त्या
'रायगडावरील मंदिरे मूर्ति'
----------------------------------
- बळवंतराव दळवी
रायगडावरील शिर्काई मंदिर, जगदिश्वर मंदिर आणि कुशार्वत रामेश्वर मंदिर ही सगळ्यांनाच ठाऊक आहेत. आज आपण रायगडाच्या पायथ्यापासून गड चढत असताना अगदी जगदिश्वरापर्यंतअसणारी मंदिरे आणि मूर्ती कोठे कोठे आहेत त्या पाहूया. चला तर सुरुवात नाणे दरवाजापासूनच करुया ...
चीत दरवाजाकडून रायगडवाडीकडे जाताना उजव्या हाताला एक पायवाट वर जाताना दिसते. हा मार्ग म्हणजे शिवकालीन राजमार्ग. याच वाटेने शिवछत्रपती कधी पालखीने तर कधी पायी उतरले आणि रायगड चढले असतील तो हा राजमार्ग. आज आपण मंदिरे आणि मूर्तीविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे रायगडावरील मार्गाची माहिती आपण पुन्हा पुढे पाहूच.
नाना किंवा नाणे दरवाजाच्या पहिल्या कमानीच्या उजव्या बाजूला कानोड्यात हत्तीची मूर्ती आहे. डावीकडच्या कमानीत श्री मारुतीची सुबक मूर्ती आहे. मूर्ती विज्ञानानुसार ही मूर्ती वीर मारुतीची आहे.
नाणे दरवाजाजवळ ही मारुतीची मूर्ति असण्याचे कारण म्हणजे दरवाजावरील पहारेकऱ्यांना संरक्षणाचा दिलासा. कारण तो काळच असा होता की, कितीहि शूर असलेला वीर भूत-प्रेत, मंत्र-तंत्र, प्रेत आदि अदृश्य शक्तींना घाबरत होता . साहजिकच अशा एकाकी जागेंत अदृश्य शक्तींपासून आपले रक्षण व्हावें म्हणून, अशा एकाकी पहाऱ्यांच्या जागांवर श्री मारुती मूर्ती आढळतात. शिवकाळात गावाच्या वेशीवर अनिष्ठनिवारणासाठी मारुती स्थापन केला जाई. नंतर समर्थ रामदास स्वामींच्या प्रचारानें श्री मारुती विषयीं लोकांचे विचार बदलून गावाच्या वेशीवरुन गावात आणि पुढे तालमीत श्री मारुतीची स्थापना झाली.
आपण नाणे दरवाजा मागे टाकत पुढे सरकतो.
मदार मोर्चा किंवा महादेवाचा माळ ( याला काही जण मशीद मोर्चा या चुकीच्या नावानेही ओळखतात) मार्गे पुढे खडकात खोदलेल्या तीन खोल्या दिसतात. डावीकडच्या स्तंभावर उद्भूत श्रीमारुति दिसतो. परंतु कोणीतरी दाखविल्याशिवाय स्तंभावरील हा संरक्षक मारुती दर्शन देत नाही.
रायगडाच्या माथ्यावर आल्यानंतर हत्ती तलावाच्या डावीकडे खडकात खोदलेले हनुमान टाके दिसते.
काहीजण याला चांभार टाके म्हणतात. शिवकाळात इतर समाजांतील स्त्रिया या पाणवठ्यावर पाणी भरण्यास येत असं सांगितले जाते. त्या एकट्या दुकट्या स्त्रियांना त्या पाणवठ्यावरील अनामिक दृष्ठ शक्तीनीं भेडसावूं नये म्हणून त्या टाक्यांवर श्री मारुती स्थापिला गेला.
आपण होळीच्या माळावर येताना उजव्या हातास शिर्काई मंदिर आहे. शिर्काई देवळी भोवती झोलाई - सोमजाई देवता आहेत. एक पाय तुटलेली पुरुषदेवतेची मुर्ति, सती शिळा, वीरगळ अशा पाषाणमूर्ति आहेत. गंगासागराच्या दक्षिणेस बालेकिल्ल्याच्या पोटाशी असलेल्या एका घळीत गजाननाची मूर्ति आहे.
आपण राजवाडा मागे टाकत हिरकणी बुरुजापाशी येतो तिथे ३ तोफा आहेत. आणि बुरुजातील तटबंदीत स्थापिलेला श्री मारुती आहे.
होळीच्या माळावरुन नगारखान्यात जाणाऱ्या वाटेच्या डावीकडे उतरणाऱ्या मार्गाने आपण श्री व्याडेश्वर किंवा कुशावर्त रामेश्वर मंदिरात पोहचतो. रायगडावरील सर्वात प्रसिध्द मंदिर म्हणजे श्री जगदिश्वर महादेवाचे मंदिर. या मंदिरात आज असलेली शिवपिंडी शिवकालातील नसून नवनिर्मित आहे. सुर्वण सिंहासनावर बसणाऱ्या छत्रपति शिवरायांचे श्री जगदिश्वर दैवत एवढे सामान्य पाषाणाचे असेल काय ?
१६८९ मध्यें किल्ले रायगडवर मोगलांचा अंमल
बसण्याआधी छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या मौल्यवान शिवपिंडी भ्रष्ट होऊ नये म्हणून मराठ्यांनी किल्ले रायगडखालील 'वारंगी' गावात शिवमंदिरात स्थापन केली. आजही ती शिवपिंडी त्या गावात आहे. अशीच एक शिवपिंडी रायगड-महाड मार्गावरील प्रभू घराण्यांची मांदियाळी असलेल्या 'नाते' या गावातील शिवमंदिरात आहे. जगदिश्वर मंदिराच्या आत असणाऱ्या मूर्तिपैकी एक बलदंड श्री मारुति मुर्ति नक्की कोठे होती हे अज्ञात आहे.
श्रीशिव समाधीपासून दूर पश्चिमेस भवानी कडा. तिथल्या कड्यात
आपल्यापैकीच कोणा जिज्ञासू शिवभक्ताने या मुर्तींचा अभ्यास करायला हवा. रायगडावर आणखी कोठे मूर्ति आहेत याची नोंद ठेवायला हवी.
जय शिवराय !
आपला शिवभक्त
बळवंतराव दळवी
======
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा.
शिवचरित्र आणि सह्याद्री
www.facebook.com/shivcharitranisahyadri
बळवंतराव दळवींचे Youtube video पाहण्यासाठी
www.youtube.com/c/BalwantraoDalvi
Copyright (c) 2016 All rights reserved.
Comments
Post a Comment