रायगडावरील चोर दिंडी आणि आम्ही
रायगडावरील 'चोर दिंडी' या आधीही मी पाहिली होती पण ती महादरवाज्यातून टकमकाकडे येणाऱ्या तटबंदी मार्गाने. पण हे असं पहिल्यांदा अनुभवत होतो ......
रायगडावरील चोरदिंडी अन आम्ही
--------------------------------------------
ज्येष्ठ शुध्द द्वादशीला पुन्हा रायगडाच्या पायथ्याला पोहचलो. एक एक पायरी चढत पाउले मदार माचीकडे वळली. मदार माचीवर सोबत असलेल्या शिव-दुर्गप्रेमी (वांद्रे) च्या शिवभक्तांना माहिती देउन पुढे अंधारी गुहेपाशी पोहचलो. एका समुहातील ३ चार शिवभक्त तिथे आम्हाला भेटले. नमस्कार चमत्कार झाले. त्यांनाही सोबत घेउन आम्ही पुढे मार्ग चालू लागलो. काही अंतर चालुन गेल्यावर पुढे उजव्या बाजुने वर गेलो की आपण महादरवाज्यात पोहचतो. या मार्गाने आजही अनेक शिवभक्त जात असतात.
आम्हीही याच वाटेने निघालो. अन काही क्षणातच लक्षात आलं की आपण फार पुढे आलोय. जे शिवभक्त पुढे चालत होते ते पहिल्यांदाच आल्याने त्यांनी महादरवाज्याक्डे जाणारी वाट मागे टाकली होती. मी पुढ सरसावलो. बाकिच्यांना महादरवाज्याकडे जाणाऱ्या मार्गावर जाण्यास सांगून पुढ गेलो.
महादरवाज्याच्या या मार्गाने मी स्वतः अनेक वर्ष चढलो उतरलो आहे. पण एकदा तरी टकमक टोकाच्या खालील कड्यावरून थेट तटबंदीमध्ये लपलेल्या 'चोर दिंडी' ने गडावर प्रवेश करायचा अस मनात अनेक वेळा आलं होत.
कळत नकळत आम्ही टकमका खाली पोहचलो होतोच. पुन्हा माघारी वळून महादरवाज्याने जाण्यास मन तयार होइना. काही सोबती माझ्या मागे येण्याची इच्छा दाखवत होते. उत्साहाच्या भरात मी सुध्दा येतो म्हणणं वेगळ आणि प्रत्यक्ष कडा चढणं वेगळं. अन तेही आपलं सामान स्वतःच्या पाठीवर घेउन तो कडा चढणं म्हणजे एक दिव्यच होत. माझ्या इतर साथीदारांना महादरवाज्याच्या मार्गाने जाण्यास सांगितले.
अन नेहमी सोबत करणारे सुनिल महाडीक, सागर सातघरे, सचिन गोरिवले आणि माझा भाचा सौरभ कुबडे आणि प्रियेश हिरवे अशी सहा जणांची टीम घेउन मी टकमका खालील कड्याला भिडलो.
शिवछत्रपतींच्या जयघोषात पहिलं पाऊल उचललं. दगडाच्या खोबणीत हात घालीत, सुकलेल्या मातीचा आधार घेत त्यावर सगळं शरीर तोलून धरुन माकडांसारख चढून, उभा कडा छातीवर घेत मागचा पुढचा विचार न करता सरसर कडा चढू लागलो. वर जाण्याचा मार्ग अजिबात नव्हता. खाली वळून पाहिलं. छाती धडधडू लागली होती. माझ्यावर विश्वास ठेवून माझे सोबती माझ्या मागून हा कडा चढत होते. त्यांना काही झालं तर 'शिवछत्रपतींच्या समोर कुठल्या तोंडाने मी जाणार' अन याच विचारात असताना पायाखालून एक दगड घसरून थेट सागरच्या अंगावर गेला. पण सुदैवाने त्याला दुखापत झाली नाही. अगोदर मी चढलो. एक एक पाऊलं टाकत मागून एक एक सोबती वर चढत होते.
'आलात काय रे .. संभाळून इथून या ... "
खाली आवाज देत व्यवस्थित उभं राहता येइल अशा एका खडकावर पोहचलो. दोन्ही हात कंबरेवर ठेवून समोर दिसणारा चोर दरवाजा न्याहाळू लागलो. टकमकाखालील ढासळलेल्या तटबंदीला डाव्या हाताला सोडून समोर दिसणाऱ्या चोर दिंडीकडे जाऊ लागलो.
सागर सातघरेंच्या हाती तिथेच सापडलेला चुन्याचा एक गोळा देत म्हणालो,
" चोर दिंडी पर्यंत जाण्याच्या मार्गावर निशाण चिन्ह बनवा. म्हणजे मागून येणाऱ्याना योग्य वाट सापडेल."
मागे राहिलेल्यांचा आवाज आला,
"बळवंतराव, मार्ग कुठून आहे ?"
"या इथुनच, सावकाश ..." खाली पाहत त्यांना सुचना दिल्या.
अन मागून वर आलेल्या सुनिल , सौरभ, सचिन आणि प्रियेशने पुन्हा एकदा भगवा ध्वज फडकावत ' जय भवानी जय शिवराय' ची घोषणा दिली. आम्हाला महादरवाज्यातून पाहणारी लोकं तिथूनच जयघोष करित होती.
'चोर दिंडी' या आधीही मी पाहिली होती पण ती महादरवाज्यातून टकमकाकडे येणाऱ्या तटबंदीच्या मार्गाने. पण हे असं पहिल्यांदा अनुभवत होतो. चोर दिंडीच्या खाली खडकात खोदलेल्या पायऱ्या आहेत. त्यावर डोक टेकवून आम्ही 'चोर दिंडीत' पोहचलो.
पुन्हा माघारी वळून पाहिलं. आम्ही ज्या मार्गाने वर चढून आलो होतो तो मुळात मार्गच नव्हता. मग अनेक गोष्टी ध्यानी आल्या. हाती कोणतीही साधन नसताना आम्ही वेडे साहस केले होते. वर चढत असताना अनेक वेळा खाली उतरण्याचा मोह झाला. वर जाणारी वाट दिसत नव्हती. पाउल कुठे टेकवावं ते सुचत नव्हतं. खाली पुन्हा उतरून जाणं तर अजिबात शक्य नव्हतं. ज्यांनी आम्हाला कडा चढताना महादरवाज्यातून पाहिले होते ते तर आमच्यासाठी प्रार्थना करत होते असे आम्हाला नंतर समजले.
रायगडावर गेले १६ वर्षे जातोय. आता नवनविन ठिकाण आणि अनुभव घेण्यासाठी ( वेडे साहस कमी करून) मन आणि पाऊले पुन्हा पुन्हा रायगडाच्या दिशेने वळणार इतके मात्र निश्चित......!
विशेष सूचना :-
मी आजतागायत या मार्गांने कोणी चोरदिंडी सर केली हे ऐकलेलो किंवा वाचलेले नाही. परंतू आम्ही हा कडा चढलो त्याला वेडे साहस म्हणाता येइल. पण मार्ग फारच घातक आहे हे निश्चित. योग्य साधन असल्याशिवाय कोणी हे धाडस करु नये.
आपला शिवभक्त
बळवंतराव दळवी
======
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा.
शिवचरित्र आणि सह्याद्री
www.facebook.com/shivcharitranisahyadri
बळवंतराव दळवींचे Youtube video पाहण्यासाठी
www.youtube.com/c/BalwantraoDalvi
Copyright (c) 2016 All rights reserved.
Comments
Post a Comment